औरंगाबाद: शहीद हेमंत करकरे यांना गुरु मानत अनेक वर्ष सोबत काम केलेल्या औरंगाबादेतील एका निवृत्त पोलिस अधिकार्याने भोपाळ लोकसभेच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांचा अपमान केल्याने अतिशय उद्विग्न होत निवृत्त पोलिस अधिकारी रियाजउद्दीन देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
पोलिस दलात अधिकारी म्हणून सेवा बजावताना शहीद हेमंत करकरे यांच्यासोबत काम केल्याचे देशमुख सांगतात. एक आदर्श आणि देशभक्त अधिकारी म्हणून करकरे यांची ओळख होती. त्यांच्या नेतृत्वात काम केल्याचा अभिमान वाटत असल्याचे ते म्हणाले. भाजपने कट्टर हिंदुत्ववादीचा चेहरा असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भोपाळमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांनी आपल्या शापामुळेच हेमंत करकरे चा मृत्यू झाल्याची सांगितले. या विधानाने देशभर संताप व्यक्त होत आहे. करकरेंना आपण गुरु मानतो त्यांचा अपमान सहन झाला नाही. साध्वीना लोकशाही मार्गाने विरोध करावा यामुळेच रियाजोद्दीन देशमुख यांनी थेट भोपाळला जाऊन उमेदवारी दाखल केली.
23 एप्रिलला भरला अर्ज
शहीद हेमंत करकरे यांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी साध्वीना लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत करण्याचा निश्चय देशमुख यांनी केला आहे. 23 एप्रिल रोजी सहकुटुंब भोपाळला जाऊन त्यांनी जिल्हाधिकार्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. 24 एप्रिल रोजी पडताळणी होऊन त्यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला आहे. भाजपा देशात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप देशमुख यांनी केला.